नवी दिल्ली - वय वर्षे १६, तारीख १८ जुलै २०२४, देशाच्या राजधानी दिल्लीतून एक युवती बेपत्ता झाली. पोलीस तिचा शोध घेत होती. परंतु मुलीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यातच ९ ऑगस्टला यूपीत एका अज्ञात मुलीचा मृतदेह सापडतो. राज्यातील संबल जिल्ह्यात शेतात हा मृतदेह पडलेला आढळतो. मृतदेहाचे हातपाय बांधलेले, दिल्लीतून बेपत्ता झालेल्या मुलीसारखीच तिची ओळख होती. ही माहिती मिळताच दिल्लीतून पोलीस मुलीच्या आईवडिलांना घेऊन यूपीत पोहचतात. त्याठिकाणी आई वडील ही आमचीच मुलगी आहे अशी ओळख सांगतात.
मात्र दिल्ली पोलिसांना काही संशय होता. जे पोलीस अधिकारी यूपीत गेले होते त्यांना ही ती मुलगी नाही जी मागील १ महिन्यापासून बेपत्ता आहे. आई वडिलांनी मुलीला ओळखलं तरीही दिल्ली पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून धागेदोरे सापडत गेले आणि अखेर दिल्ली पोलिसांची एक टीम राजधानीपासून जवळपास २०० किमी अंतरावरील हरियाणात १२ ऑगस्टला पोहचले. जी मुलगी महिनाभरापासून बेपत्ता होती, जिला तिचे आई वडील मृत समजत होते ती तिच्या प्रियकरासोबत हरियाणातील पंचकूला इथं लिव्ह इनमध्ये राहत होती.
ही मुलगी तिच्या १९ वर्षीय प्रियकरासोबत मागील १ महिन्यापासून याठिकाणी लपून राहत होती. दोघांनी भाड्याने रुम घेतली होती. तिचा प्रियकर एका सोसायटीत पार्किंग कर्मचारी म्हणून काम करत होता. दिल्लीतून बेपत्ता झालेली मुलगी पंचकूला येथे होती मग तो मृतदेह कुणाचा होता जो यूपीच्या संबल जिल्ह्यात सापडला हा प्रश्न उभा राहिला. जर मुलीच्या आई वडिलांनीच मुलीचा मृतदेह असल्याची ओळख पटवली मग पोलिसांना संशय का आला? ही अनेक प्रश्न अनुत्तरीत होती.
नथीतून मिळाला पुरावा
या संपूर्ण प्रकरणात दिल्ली पोलिसांसाठी मुलीची नथ पुरावा बनली. इंडियन एक्सप्रेसनुसार, १८ जुलैला जेव्हा ही मुलगी बेपत्ता झाली तेव्हा तिच्या डाव्या नाकात नथ होती. संबलमध्ये जो मृतदेह सापडला तिने उजव्या नाकात नथ घातली होती. त्याशिवाय तपासावेळी इतर काही पुरावे सापडले नाहीत ज्यामुळे ती मुलगी यूपीच्या दिशेने गेलीय हे स्पष्ट होईल. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास सुरूच ठेवला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज आणि इतर धागेदोरे जोडत हरियाणातील पंचकूलापर्यंत पोलीस पोहचले.
कुटुंबाचा विरोध म्हणून घर सोडलं
पोलिसांच्या तपासात या मुलीने सांगितले की, मी ज्या मुलावर प्रेम करते तो दुसऱ्या धर्माचा आहे. आमच्या नात्याला कुटुंबाचा विरोध होता असं समोर आले. हे दोघे ११ वीच्या वर्गात होते. जेव्हा घरच्यांनी विरोध केला तेव्हा दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. एकेदिवशी संधी मिळताच दोघे घरातून पळाले आणि हरियाणातील पंचकूला येथे रुम भाड्याने घेऊन राहू लागले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत मुलीला तिच्या घरच्यांकडे सुपूर्द केले आहे आणि मुलावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.