बुलडाणा : जिल्ह्यातून या महिन्यांत ४८ जण बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. बेपत्तांमध्ये केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषांचीही संख्या लक्षणीय आहे. ४८ जणांमध्ये १८ पुरुष आणि ३० महिला आहेत. पुरुषांच्या बेपत्ता होण्याची टक्केवारी ३८ टक्के असून, ही बाब चिंता व्यक्त करणारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात दर दिवसाला दोन जण बेपत्ता होत असल्याचे चित्र आहे. जानेवारीच्या ३० दिवसांत ४८ जण बेपत्ता झाले. विशेष म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातून सर्वाधिक तरुण, तरुणी बेपत्ता होत असल्याची माहिती समोर येत आहे. या बेपत्ता लोकांना शोधताना पोलिसांना नाकीनऊ आल्याचे दिसून येत आहे.
पुरुषांची कारणे काय? छळवणुकीला कंटाळून महिला बेपत्ता होत असल्याचे कारण समोर येत असते. पण आता पुरुष कशाला कंटाळून बेपत्ता होत आहेत, हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. घरातील कर्ता पुरूष निघून जाणे, हे कुटुंबीयांना संकटात टाकणारे आहे.
किरकोळ कारणेबेपत्ता होणाऱ्यांमध्ये विवाहितांची संख्याही मोठी आहे. किरकोळ कारणावरून घरी वाद करून, शौचास गेली आणि परत आलीच नाही, असा उल्लेख केला जातो. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना अनेकवेळा अडथळे येत असल्याची माहिती काही पोलिसांनी दिली. मात्र, बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण बघता ही एक फॅशनच झाल्यासारखे चित्र आहे.