Bihar Online Fraud : बिहारमधील वारिसालीगंज परिसरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी 'इमोशनल ब्लॅकमेलिंग'ची नवीन पद्धत सुरू झाली आहे. वारिसालीगंजच्या महिला आमदार अरुणा देवी यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद अखिलेश सिंह हे देखील 'इमोशनल ब्लॅकमेलिंग'चे बळी ठरले आहेत. याबाबत त्यांनी वारिसालीगंज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.
आमदार अरुणा देवी यांचे प्रतिनिधी शैलेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ९ वाजता अखिलेश सिंह यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणारा व्यक्ती त्यांच्या एका चुलत भावाच्या आवाजात बोलत होता. त्या व्यक्तीने आपल्या नातेसंबंधाबद्दल सांगत आपली आई रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या उपचारासाठी तातडीनं ५० हजार रुपयांची गरज आहे, असे अखिलेश सिंह यांनी सांगितले.
स्कॅनरद्वारे २५ हजार रुपये पाठवलेनातेवाइकांची अडचण समजून अखिलेश सिंह यांनी सांगितले की, सध्या खिशात २५ हजार रुपये आहेत. तुम्ही म्हणाल तर पाठवू शकतो. त्यावर फसवणूक करणाऱ्याने स्कॅनर पाठवून रक्कम ट्रान्सफर करण्याची विनंती केली. त्यानंतर अखिलेश सिंह यांनी स्कॅनरवर २५ हजार रुपये पाठवले. काही वेळाने त्यांना फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी संबंधित नातेवाईकाच्या घरी फोन केला. त्यानंतर त्याच्या आईचे पाच वर्षांपूर्वी निधन झाल्याचे समोर आले. यानंतर अखिलेश सिंह यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात अर्ज करून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे.
30 हजार रुपयांची आणखी एक फसवणूकबुधवारी कुंभी ब्लॉकमधील रहिवासी सुरेश सिंह यांचा मुलगा संजीत कुमार उर्फ भोथू याची अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यालाही चुलत भावाच्या आवाजात फोन आला होता. फसवणूक करणाऱ्याने सांगितले की, आई रुग्णालयात दाखल आहे. ५० हजारांची तातडीने गरज आहे. त्यावर संजीतने ३० हजार रुपये त्याच्या स्कॅनरला पाठवले. फसवणूक करणाऱ्याने काही तासात पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, बराच वेळ होऊनही रक्कम परत आली नाही, तेव्हा संजीतने फोन केला. त्यावेळी फसवणूक करणाऱ्याने सांगितले की, त्याच्या खात्यातून ५० हजारांपेक्षा कमी रुपये ट्रान्सफर होत नाहीत, त्यामुळे आणखी ३० हजार पाठवा. त्यानंतर संपूर्ण रक्कम एकाच वेळी परत केली जाईल. त्यामुळे फसवणुकीचा संशय आल्याने संजीतने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.