लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : मायणी, ता. खटाव येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यात आमदार जयकुमार गोरे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्यासमोर वडूज पोलीस ठाण्यात सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मायणी येथील मृत भिसे यांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली होती. यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर, दत्ता गुटुगडे, महेश बोराटे यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आ. गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती.
सध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दि. १ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असून, याप्रकरणी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर सोमवार, दि. २७ रोजी वडूज पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करत जबाब नोंदवण्यात आले आहेत.