अहमदनगर - विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने आमदार शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्यासह सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश काल जिल्हाधिकाऱ्यांनी काढला.
विविध गंभीर गुन्हे दाखल असतील तर अशा व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाते. त्याच अनुषंगाने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते, माजी नगरसेवक सचिन जाधव या सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करून शस्त्रे जमा करावीत, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे आला होता.
केडगाव येथे वर्षभरापूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात आमदार कर्डिले, जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर केडगाव येथे दगडफेक केल्याच्या कारणावरून अनिल राठोड, दिलीप सातपुते, सचिन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्लाप्रकरणी दादाभाऊ कळमकर आरोपी होते. याशिवाय या सर्वांवर आणखीही काही गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यावर अंतिम निर्णय घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी या सहाजणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश काढला.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील सुमारे साडेपाचशे व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई केली होती. आताही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार उपद्रवी व्यक्तींची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांच्यावर तडीपारी किंवा इतर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.