गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांत राडा झाला होता. यावेळी सरवणकर यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या असा आरोप शिवसेनेचे नेते करत आहे. असे असताना आज पुन्हा सरवणकर आणि शिवसैनिक भिडता भिडता राहिले.
माहिममध्ये दसरा मेळ्याव्यावरून शिंदे समर्थकांची बैठक सुरु होती. ही बैठक संपल्यावर सदा सरवणकर बाहेर य़ेत होते. इथे ठाकरे गटाचे शिवसैनिक शिवसेनेच्या शाखेसमोर उभे होते. यावेळी शिवसैनिक आणि सरवणकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी पोलीस अधिकारी आणि पोलीस फौजफाटा असल्याने मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला.
गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून त्या रात्री प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली होती. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा नोंदविला होता. पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान, सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे खळबळ उडाली होती.