नाशिक : नांदगाव मतदारसंघासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीच्या वाटपावरुन निर्माण झालेला वाद आता चांगलाच रंगला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुध्द उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कांदे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि.२८) दुपारी तक्रार अर्ज दिला आहे.नांदगाव मतदार संघासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीचे सम-समान वाटप न केल्याचा आरोप करत कांदे यांनी गेल्या ५सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन दाखल केली. तसेच या याचिकेत सामनेवाले असलेले पालकमंत्री भुजबळ यांच्याविरुध्द पुरावेही दाखल केल्याचा कांदे यांनी तक्रार अर्जात केला आहे. सोमवारी (दि.२७) कांदे हे गंगापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथील त्यांच्या घरी असताना संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संशयित अक्षय निकाळजे नावाच्या व्यक्तीेेने फोन केला. यावेळी त्याने ‘मी अक्षय निकाळजे बोलत आहे, मी छोटा राजनचा पुतण्या असून तुम्ही उच्च न्यायालयात जे रिट पिटिशन दाखल केलेले आहे, ते कोर्टातून काढून घ्या अन्यथा तुमच्यासाठी व कुटुंबियांसाठी चांगले होणार नाही...’ अशी धमकी दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. यानंतर कांदे यांनी हा फोन कट केला आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजता त्या क्रमांकावर फोन केला असता कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नसल्याचे त्यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, कांदे यांच्या तक्रार अर्जानंतर पोलीस आयुक्तालयाकडून काय पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे.