लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गाडीला कट मारण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादात एका माजी खासगी सुरक्षा रक्षकाने भर रस्त्यात युवकावर पिस्तुल रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रताप धर्म टक्के (वय ३९, रा. के डी हिल्स, शेलार मळा) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून हडपसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रताप हा जून ते डिसेंबर २०२३ दरम्यान एका आमदारांकडे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. सध्या तो त्यांच्याकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत नाही.
याबाबत हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवक हडपसर येथील माळवाडी येथे मोटारसायकलवरुन बुधवारी सायंकाळी ७ वाजता जात होता. यावेळी या तरुणाबरोबर प्रताप टक्के याचे गाडीला कट मारण्याच्या कारणावरुन किरकोळ वाद झाला. त्यावेळी प्रताप याने त्यांच्याकडील पिस्तुल त्या युवकावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. या युवकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रताप टक्के याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील पिस्तुल जप्त केले आहे.