Avinash Jadhav Arrest: मुंबईतील टोल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यांसंदर्भात पत्रकार परिषद घेत काही विधाने केली. त्यानंतर टोलनाक्यांवर दुचाकी व चारचाकी वाहने विनाटोल सोडून देण्याची मागणी करत मनसैनिकांनी अनेक टोलनाक्यांवर ठाण मांडले. याच दरम्यान, प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी मुलुंड टोल नाक्यावर आलेल्या मनसेचे अविनाश जाधव यांच्यासह काही पदाधिकार्यांना दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काय होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष असताना, या सर्व पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरा मुलुंडच्या नवघर पोलिसांनी अटक केली.
याआधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड टोलनाका येथील टोलचौकी सोमवारी सायंकाळी पेटवली होती. या जाळपोळीत चौकीतील साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती होती. त्यामुळे या प्रकरणातही जाळपोळ करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले जात आहे. मुलुंड टोल नाका जाळपोळ प्रकरणी अविनाश जाधव आणि १२ मनसैनिकांना अटक करण्यात आली. आयपीसी १४१,१४२,१४३,१४५,१८६,१०७ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१,३) कलमांतर्गत नवघर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच मुलुंड टोल नाका पेटविणाऱ्या रोशन वाडकर या पदाधिकाऱ्याला आयपीसी कलम ४३६ आणि डेमेज पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट कलम ३,४ कलमांतर्गत अटक झाली आहे.
अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे रवींद्र मोरे, पुष्करराज विचारे, संदीप साळुंखे, सत्यवान दळवी यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच नवी मुंबई ऐरोली विधानसभा अध्यक्ष कल्पेश बेमोसे, भूषण आगीविले, विश्वनाथ दळवी दीपक सिंग, दत्ता कदम, संतोष जाधव या मनसे पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.