उल्हासनगर : मनसेचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांना दोन अज्ञात तरुणांनी मारहाण व हल्ला केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगरमनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व कल्याण उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे सोमवारी रात्री साडे दहा वाजता लालचक्की चौकात मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी गोडसे यांच्या हातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत गोडसे खाली पडले असून त्यांच्या हाताला लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन अज्ञात तरुण त्यांचा गळा धरून खेचत होते. तसेच त्यांचा मारण्याचा हेतू असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र चौकात काही प्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्याने, ते पळून गेले. विठ्ठलवाडी पोलिसांनी हा प्रकार मोबाईल चोरीचा असू शकतो. अशी शक्यता व्यक्त केली.
डेटिंग अॅपवरून तब्बल १६ युवकांना लुबाडणारी ‘बंबल-बी’ तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
यापूर्वी मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर असाच हल्ला गेल्या काही महिन्यांपूर्वी मॉर्निंग वॉक वेळी झाला होता. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली असून त्यातील एक जण चक्क महापालिका अधिकारी निघाल्याने एकच खळबळ उडाली होती. सोमवारी झालेल्या प्रदीप गोडसे यांच्या मारहाण व हल्ला प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी मनसेकडून होत आहे. तर विठ्ठलवाडी पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे. हल्लेखोराना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली.