नवी मुंबई - मनसे कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन आरोपींना कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे मयूर चिपळेकर ,तेजस म्हात्रे आणि किरण सोलकर अशी नावे आहेत. मुख्य आरोपी नगरसेवक विजय चिपळेकर अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर २९ एप्रिलला जीवघेणा हल्ला केला होता. विजय चिपळेकर यांनी आठ ते दहा गुंडांसोबत स्वतः प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला होता. २९ एप्रिलला मतदानादिवशी १२ वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले होते. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात समोर येत आहे. २९ एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर कट रचून हा हल्ला करण्यात आला आहे. कामोठे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.