कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन केल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. यामुळे अनेकांनी काहीच पर्याय राहिला नसल्याने गुन्हेगारीकडे लक्ष वळविले आहे. अशातच राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खळबळजनक प्रकार घडला आहे. एका महिलेने पोलीस ठाण्य़ात गुन्हा नोंदविला असून एक तरुण तिला मोबाईलवर फोन करतो, तसेच व्हॉट्सअॅपवर तिचे अश्लिल फोटो पाठवितो आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत 3.50 लाख रुपये मागितले आहेत.
यानंतर घाबरलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बनाड ठाण्याचे प्रभारी अशोक आंजना यांनी सांगितले की, महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत तिला गेल्या काही दिवसांपासून एका अज्ञात नंबरवरून फोन येत होते. त्याच नंबरवरून तिचे आक्षेपार्ह फोटो पाठविले जात होते. तसेच हे खासगी फोटो व्हायरल करण्याच्या नावावर ब्लॅकमेल करत होता. तसेच तिच्याकडे या बदल्यात पैशांची मागणी केली होती.
पोलिसांनी यानंतर लगेचच एफआयआर दाखल करून घेत आरोपीला अटक केली आहे. चौकशीवेळी आरोपीने जे सांगितले ते धक्कादायक होते. तो आरोपी महिलेच्या पतीचा मित्र होता. त्याने पाच वर्षांपूर्वी त्याने महिलेच्य़ा पतीच्या मोबाईलचा बॅकअप लॅपटॉपमध्ये घेतला होता. मात्र, लॉकडाऊन नंतर आर्थिक अडचण जाणवू लागल्याने महिलेला तिच्या पतीसोबतचे अश्लिल फोटो पाठवून ब्लॅकमेल करत होता. महिलेचा पती आणि आरोपी काही वर्षांपूर्वी एकत्र काम करत होते. त्यावेळी त्याने हा बॅकअप आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवला होता.