मुंबई : वरळीतील तरुणाने ‘गुगल पे’ या मोबाइल अॅपवरून १४९ रुपयांचे मोबाइल रिचार्ज केले. मात्र रिचार्ज झाले नाही, म्हणून गुगलवरील ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा पैसे रिफंड मिळण्याच्या नादात तरुणावर तब्बल ३९ हजार गमाविण्याची वेळ आली.वरळी गांधीनगर परिसरात राहणारा अली अहमद हसीम शेख (३३) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो वरळी परिसरातच साड्यांना एम्ब्रॉयडरीचे काम करतो. २९ एप्रिल रोजी ‘गुगल पे’वरून त्याने १४९ रुपयांचे रिचार्ज केले. मात्र रिचार्ज झाले नाही, म्हणून त्याने गुगलवरून ग्राहक सेवेचा क्रमांक मिळवून संपर्क साधला. तेथे दिलीप कुमार सोनी नावाच्या तरुणाला त्यांनी रिचार्जसाठीचे पैसे दिले. मात्र रिचार्ज झाला नाही. त्याने, पैसे रिफंड करतो असे सांगून, एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. शेखनेही विश्वास ठेवून अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. त्याचा अॅप्लिकेशन क्रमांक सोनीला सांगताच, त्याने ओके बटन दाबायला सांगितले. पुढे, आलेला पिन क्रमांक देताच, पैसे परत मिळतील, असे सोनीने सांगितले. त्याने पिन क्रमांक सांगताच त्याच्या खात्यातून ३८ हजार ८८८ रुपये लंपास करण्यात आले. त्यानंतर, आणखी ४९९ रुपये काढल्याचा संदेश धडकला.अशेन संशय आल्याने शेखने याप्रकरणी वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
मोबाइलचे १४९ रुपयांचे रिचार्ज पडले ३९ हजारांना, ‘गुगल’वरून तरुणाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:43 AM