मनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सध्या सर्वच रेल्वे गाड्या रुळावर धावू लागल्या आहेत. यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून, प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. या चोरट्यांनी मनमाड - नाशिक दरम्यान भाजपच्या दोन आमदारांनाही आपला हिसका दाखविला आहे. नांदेड व परभणीच्या आमदारांचा मोबाइल व वस्तू चोरीला गेल्याची तक्रार लोहमार्ग पोलिसात दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे प्रवासात भाजपच्या दोन आमदारांचे मोबाइल चोरीला गेल्याच्या घटना घडली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी व प्रवासी रेल्वे गाडीतील असल्यामुळे रेल्वे प्रवासात होणाऱ्या चोरीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पहिली घटना देवगिरी एक्स्प्रेसमध्ये घडली. या रेल्वेतून परभणीच्या आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर या प्रवास करत होत्या. त्यांचा मोबाइल या प्रवासात चोरीला गेला. या चोरीप्रकरणी मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये घडली. या रेल्वेतून नांदेड येथील भाजप आमदार राम पाटील रातोळीकर हे प्रवास करत होते. चोरट्यांनी मनमाड येथे त्यांचा व पीएचा मोबाइल लंपास केला. तर सहप्रवाशाची कॅश असलेली पर्सही चोरली. ही बाब नाशिक येथे लक्षात आली. त्यामुळे हा गुन्हा नाशिक रेल्वे पोलिसांनी दाखल केला. या चोरी प्रकरणात मालेगाव येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण, त्यांच्याकडून आमदारांचा मोबाइल मिळाला नाही. त्यांच्यासोबत असणाऱ्या पीएचा मोबाइल व सहप्रवाशांकडून चोरलेली कॅशची पर्स मात्र या चोरट्यांकडून मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रेल्वेतील चोऱ्या पुन्हा चर्चेत
आठ दिवसात या दोन्ही घटना घडल्या असून, रेल्वे प्रवासादरम्यान चोरी होण्याचे प्रकार नवीन नाहीत. या अगोदर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीचे देखील प्रवासादरम्यान चोरट्यांनी पाकीट लंपास केले होते. माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांचे मनमाड येथे चोरट्यांनी पाकीट लंपास केल्याने चर्चेला उधाण आले होते. चक्क आता आमदारांचे मोबाइल चोरीला गेल्यामुळे पुन्हा रेल्वेच्या या चोऱ्या चर्चेत आल्या आहेत.