Divya Pahuja Murder Case ( Marathi News ) : मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात पुन्हा एकदा नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे. कारण या प्रकरणातील आरोपी अभिजीत सिंह याने दिव्या ब्लॅकमेलिंग करत असल्यामुळे मी तिची हत्या केल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांना याबाबतचे पुरावे सापडले नसून त्याने वेगळ्याच कारणातून दिव्याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्याने चेष्टेत अभिजीतबाबत एक वैयक्तिक टिपण्णी केली होती. त्यानंतर रागावलेल्या अभिजीतने थेट दिव्यावर गोळी झाडली. तेव्हा तो नशेत होता, अशी माहिती आहे.
दरम्यान, एसआयटीची टीम आरोपी अभिजीत आणि बलराज सिंह यांची कसून चौकशी करत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा पुरावा असणारा दिव्याचा दुसरा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
१० दिवसानंतर सापडला मृतदेह, कसा लागला आरोपींचा शोध?
मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह हत्या झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. पोलिसांना दिव्याचा मृतदेह तोहाना येथील कॅनॉलमध्ये आढळला. २ जानेवारीला दिव्या पाहुजाची हत्या झाल्याची घटना समोर आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेत असतानाचे आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आढळून आले होते. त्याआधारे पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या तपासानंतर दिव्या पहुजाच्या मृतदेहाचा ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्यानंतर शोधमोहीम हाती घेऊन पोलिसांनी दिव्याचा मृतदेह तोहाना येथील कॅनॉलमधून शोधून काढला.