लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : नागम्मा हनुमंत शेट्टी (४०) या महिलेचा तीन महिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला असला, तरीही तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलीस करीत असून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी व तिच्या मुलांचे म्हणणे आहे. एक चमचा हरवला म्हणून नागम्मा आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा पाच महिन्यांपूर्वी वाद सुरू झाला होता. दोन दिवसांपूर्वी कुत्र्याला केलेल्या मारहाणीवरून पुन्हा वाद झाला आणि नागम्माला बेदम मारहाण केली. यातच तिचा जीव गेला. तिच्या चार मुली व एक मुलगा पोरके झाले.
नागम्मा आणि हनुमंत शेट्टी (४५) हे मानपाडा रोड परिसरातील एका चाळीत चार मुली आणि एका मुलासह राहत होते. याच परिसरातील एका वडापावच्या स्टॉलवर शेट्टी दाम्पत्य कामाला होते. एके दिवशी काम करीत असताना नागम्माकडून स्टॉलवरील चमचा हरवला. मात्र, चमचा हरवला नसून तो नागम्मानेच चोरल्याचे स्टॉल चालवणाºया महिलेचे म्हणणे होते. नागम्माने नवीन चमचा आणून दिला तरीसुद्धा ती महिला नागम्माला सतत टोमणे मारत होती. दरम्यान, १० आॅक्टोबर २०१९ रोजी नागम्माचा पती हनुमंत याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर, आपल्या तीन मुलींचे शिक्षण, घरखर्च या जबाबदाºया नागम्माच्या अंगावर येऊन पडल्या. त्या महिलेचे टोमणे सहन करूनही नागम्मा कामाला जात होती. या दोघींमध्ये नेहमीच वाद होऊ लागल्याने वादाला कंटाळलेल्या नागम्माने शनिवारी स्टॉलवर काम करण्याचे बंद केले.
काम बंद केल्यानंतर नागम्मा घरीच होती. नागम्माच्या घरी एक कुत्री आहे. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास या कुत्रीला त्रास देण्यावरून नागम्मा आणि शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी, स्टॉल चालविणारी महिला हा वाद पाहून हसू लागली. नागम्माच्या मुलीने तिला त्याबाबत जाब विचारला. याच गोष्टीचा राग आल्याने त्या महिलेने आपल्या दोन बहिणींना फोन करून बोलावले. या तिघींनी मिळून नागम्माला घरातून बाहेर खेचून मारहाण केली. मारहाणीमध्ये जखमी झालेली नागम्मा मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. यावेळी, पोलिसांनी शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास सांगून तिला मेमो लिहून दिला. आपल्या मुलीसोबत पोलीस ठाण्यात नागम्मा गेली खरी. मात्र, तेथून रुग्णालयात जाण्यासाठी नागम्माकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून, आपल्या मोठ्या मुलीसोबत घरी गेली. घरी गेल्यानंतर, नागम्माला त्रास सुरू झाल्याने जवळील डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी नागम्माला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. नागम्माला जवळील एका रुग्णालयात तिच्या मुली घेऊन गेल्या. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर नागम्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणात पोलीस दाद देत नसल्याने नागम्माच्या मुलींसह नातेवाइकांनी भाजप ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे यांची भेट घेतली. राणे यांनी नागम्माच्या कुटुंबीयांसह मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. शवविच्छेदन अहवालामध्ये नागम्माचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.
शेजाºयांची बघ्याची भूमिकातीन महिलांनी केलेल्या मारहाणीचा धसका घेतल्याने मारहाणीमुळेच नागम्माचा मृत्यू झाल्याचे तिच्या भावजयीचे म्हणणे आहे. आईच्या चेहºयावर मारहाणीमुळे नखांचे ओरखडे दिसत होते. तरीसुद्धा पोलीस सहकार्य करीत नसल्याची खंत नागम्माच्या मुलीने व्यक्त केली. आईला मारहाण होत होती, त्यावेळी शेजारी केवळ बघत होते. एकही आमच्या मदतीला धावून आले नसल्याचे त्यांच्या मुलींचे म्हणणे आहे.तीन महिलांसोबत भांडण झाल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी नागम्मा आली होती. तिला मेमो देऊन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी जाण्यास सांगितले होते. मात्र, रुग्णालयात न जाता ती घरी गेली. रात्री त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या नागम्माचा मृत्यू झाल्याचे मानपाडा पोलिसांचे म्हणणे आहे.आईचा अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी, काहीजणांनी आम्हाला आर्थिक मदत केल्याने बुधवारी दुपारी जवळील स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कार केल्याचे नागम्माच्या मुलीने सांगितले.
त्या तीन महिलांनी केलेल्या मारहाणीमध्ये नागम्माला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे, पोलिसांनी त्यांना अटक करावी.- मनीषा राणे, ग्रामीण अध्यक्षा, भाजप