मुंबई - पश्चिम रेल्वेवरील गजबजलेल्या दादर स्थानकात एका महिलेचा एका पुरुषाने विनयभंग केला. २५ ऑगस्ट रोजी रात्री ९.४० वाजता ही घटना घडली. ही महिला आपल्या आई आणि बहिणीसोबत फलाटावर उभी होती, तितक्यात तिथे आरोपी आला आणि त्याने तिला वाईट स्पर्श केला. त्यावेळी तिने त्याला हटकले तेव्हा त्याने चाकू काढला आणि तिला आणि सहप्रवाशांना मारण्याची धमकी दिली. त्याला रेल्वे पोलीसांनी अटक केली. वर्गीस डिसोझा (वय -३९) असं या आरोपीचं नाव आहे. तो धारावीत राहतो. त्याच्यावर याआधीही मारहाण, दरोड्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
फिर्यादी महिला नालासोपारा येथे राहते. ती २५ ऑगस्टला तिच्या आई आणि बहिणीसोबत चेंबूरला गेली होती. घरी परतण्यासाठी त्यांनी चेंबूरहून कुर्ला-दादर असा प्रवास करून दादर रेल्वे स्थानकावर पोचली. फलाट क्रमांक ३ वर त्या तिघी विरार जलद लोकलची वाट पाहत उभ्या होत्या. तितक्यात वर्गीस हा आरोपी तेथे आला आणि त्याने तिला वाईट स्पर्श केला. तिने त्याला हटकले त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. इतर महिला प्रवाशांनी हा प्रकार पाहताच त्याला मारायला सुरुवात केली. आपल्यावर जमाव धावून आल्याचे पाहतच त्याने चाकू काढला आणि त्यांना धमकावू लागला. गस्तीवर असणाऱ्या रेल्वे पोलीसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याला पकडले, अशी माहिती मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धीवर यांनी दिली.