अकोला : बार्शिटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री संत तुकडोजी महाराज आश्रम शाळेतील एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल विशेष न्यायाधीश ए.डी. पिंपरकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दिला. आरोपीला १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील श्री संत तुकडोजी महाराज आश्रमशाळा असून, या आश्रमशाळेत कौलखेड चौकातील न्यू खेताननगर येथील रहिवासी रघुनाथ आनंदा नवघरे व ५३ वर्षे हा शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने आश्रमशाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा वर्गातील विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर ९ जानेवारी २०१६ रोजी विनयभंग केला होता. त्यानंतर हा प्रकार सुरू असल्याने मुलीने तिच्या आईला माहिती दिली. मुलगी व तिच्या आईने या गंभीर प्रकरणाची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. मुख्याध्यापकांनी चौकशी केल्यानंतर मुलीच्या आईला या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यास सांगितले. यावरून अल्पवयीन मुलीच्या आईने बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी करून १६ जानेवारी २०१६ रोजी शिक्षक रघुनाथ आनंदा नवघरे याच्याविरुद्ध पोस्को कायद्याच्या कलम ३ १२ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास वैशाली गणवीर यांनी करून दोषारोपपत्र पोस्कोच्या विशेष न्यायालयात दाखल केले. त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.डी. पिंपरकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिक्षक रघुनाथ आनंदा नवघरे यास पोस्को कायद्याच्या कलमान्वये दोषी ठरवीत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या सोबतच पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणांमध्ये मुख्याध्यापक व तपास अधिकारी वैशाली गणवीर यांची साक्ष महत्त्वाची ठरली, तर फिर्यादी मुलगी व तिची आई न्यायालयासमोर फितूर झाले. त्यामुळे न्यायालयाने मुलीच्या आईवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
फिर्यादी मुलगी व तिची आई फितूर
पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयासमोर अल्पवयीन फिर्यादी मुलगी व तिच्या आईने बयाण देताना गडबड केली. यावरून फिर्यादी मुलगी व तिची आई न्यायालयात फितूर झाल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. त्यामुळे विशेष न्यायालयाने फिर्यादी मुलीच्या आईवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
मुख्याध्यापक तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची
पोस्को कायद्याच्या विशेष न्यायालयासमोर फिर्यादी मुलगी व तिची आई फितूर झाल्यानंतर मुख्याध्यापक व तपास अधिकारी वैशाली रणवीर या दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यामुळे आई व मुलगी फितूर झाल्यानंतरही न्यायालयाने मुख्याध्यापक व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची धरून आरोपीला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.