पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: एका वृद्धाने आपल्या उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी घरात आणून ठेवलेली २ लाखाची रोख रक्कम आणि ६ लाख ९० हजाराचे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. दाबोळी येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय हेमील्टन फुर्तादो ह्या वृद्ध इसमाच्या घरातून त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ८ लाख ९० हजाराची मालमत्ता लंपास केल्याचा संशय हेमील्टन आणि त्याच्या पत्नीने व्यक्त केल्याने पोलीस त्या मार्गाने चौकशी करित आहेत. त्या वृद्ध जोडप्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला आणि अन्य एका महीलेला वास्को पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याशी त्या चोरी प्रकरणात चौकशी करत असल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी (२५) त्या चोरीचा प्रकार उघडकीस आला. दाबोळी येथील एका बंगल्यात हेमील्टन फुर्तादो हा वृद्ध इसम त्याची पत्नी आणि १० वर्षाच्या नातीसहीत राहतो. हेमील्टनवर उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांने दोन लाखाची रक्कम घरात आणून ठेवली होती. सोमवारी हेमील्टन घरातील कपाटात आणून ठेवलेली रक्कम पाहण्यासाठी गेला असता ती गायब असल्याचे त्याला आढळून आले. घरात आणून ठेवलेली रक्कम गायब असल्याचे त्याला आढळून येताच त्यांनी त्याबाबत त्याच्या पत्नाला कळविले. हेमील्टन याच्या पत्नीने नंतर घरातील इतर सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना दोन लाखाच्या रोख रक्कमीसहीत घरात असलेले ६ लाख ९० हजाराचे सोन्याचे ऐवजही गायब असल्याचे आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी घरातून ८ लाख ९० हजाराची मालमत्ता लंपास केल्याचे समजताच हेमील्टन यांनी वास्को पोलिस स्थानकावर तक्रार दिली.
हेमील्टन यांच्या घरात एक महिला मोलकरीण कामाला असून त्या चोरी प्रकरणात त्यांनी तिच्यावर संशय निर्माण केल्याने पोलीसांनी मोलकरणीला ताब्यात घेऊन तिच्याशी चौकशीला सुरवात केली. त्या महीला मोलकरणीशी चौकशी करताना पोलीसांना त्या चोरी प्रकरणात मोलकरीण आणि अन्य एका महिलेचा हात असण्याचा दाट संशय निर्माण झाला. त्यामुळे पोलीसांनी त्या मोलकरणीसहीत अन्य एका महीलेला ताब्यात घेतले असून त्या वृद्ध जोडप्याच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणात त्यांच्याशी कसून चौकशी करित आहेत. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.