- मनीषा म्हात्रे
मुंबई : ग्राहकांनी पोस्टाच्या विविध योजनांत गुंतवलेल्या पैशांतील १०० रुपयांपासून काही हजार रुपयांवर सब पोस्टमास्तरने डल्ला मारल्याचा प्रकार दादरमध्ये घडला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या सब पोस्टमास्तरने एकूण ८० हजार ९७६ रुपये आपल्या खात्यात वळते करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दादर पोस्ट ऑफिसच्या अधीक्षक सुजाता सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, नायगाव पोस्ट ऑफिसमध्ये सब पोस्टमास्तर विजय श्रीपत मोरे यांनी ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सेव्हिंग बँक अकाउंट, किसान विकासपत्र, आवर्ती खाते (आरडी), सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम अकाउंट, क्लोझिंग बॅलन्सिंगमध्ये आयपीपीबीची रक्कम ऑफिसमध्ये न भरता या व्यवहारामध्ये ८० हजार ९७६ रकमेचा अपहार केला आहे.
हे समोर येताच गेल्या वर्षी ३ मार्च रोजी मोरेंवर निलंबनाची कारवाई करत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. याचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी सांगितले आहे.
फसवणूक करण्यासाठी मोरे हा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा युजर आयडी व पासवर्ड हा स्टाफला दमदाटी करून स्वतःकडे ठेवून त्यांच्या अकाउंटमध्येही ढवळाढवळ करून फसवणूक करत असल्याचे समोर आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.