मुंबई - रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी हिटसंबंध असल्याचे सांगून त्यांच्यामार्फत 'सतत' या योजनेत कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. त्यासाठी आरोपीने पीयूष गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल देखील बनवला होता. ज्योतिकुमार अगरवाल असे अटक आरोपीचे नाव असून तो शीव येथील रहिवासी आहे.
या प्रकरणातील तक्रारदार मनीष पटेल (54) हे पर्यावरण सल्लागार आहेत. याबाबत माटुंगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल हा पटेल यांचा मित्र आहे. त्याने आपले पीयूष गोयल यांच्याशी चांगले संबंध असल्याची बतावणी करून त्यामार्फत 'सतत' या योजनेंतर्गत 50 ते 75 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सप्टेंबर 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीत गोयल यांना भेटवस्तू आणि इतर कारणांसाठी दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर पीयूष गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून स्वतःला ई-मेल पाठवला व हाच ई-मेल पुढे आरोपीने पटेल यांना पाठवला. तसेच १ लाख 75 हजार रुपयांचे एनइएफटी केल्याचा मेसेजही तक्रारदाराला पाठवला. त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी तिसऱ्या मित्राच्या मदतीने गोयल यांच्या कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी ही फसवणूक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार पटेल यांनी याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अगरवालला अटक केली.