पुणे : बंदी असलेल्या माओवाद्यांकडून सक्रिय संघटनांना पैशांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले. आयएपीएल (इंडियन असोसिएशन्स पिपल्स लॉयर्स) ही संघटना प्रतिबंधित सीपीआय (एम) च्या पैशावर चालत असल्याची माहिती पोलिसांनी जप्त केलेल्या पुराव्यांद्वारे उजेडात आणली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (एम) माओवादी संघटनेची आयएपीएल ही सक्रिय संघटना आहे. त्यामुळे एल्गार प्रकरणी जामीनासाठी अर्ज केलेल्यांचा जामीन फेटाळण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली.कॉम्रेड प्रकाशने शोमा सेन यांना पत्र पाठवून महत्त्वाचे ईमेल डिलीट करण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) सुनावणी होणार आहे. जप्त केलेली कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डाटाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयीत माओवाद्याचा सहभाग उघड झाला आहे. म्हणून त्याचा जामीन नाकारावा अशी मागणी केली. दहशतवादी कारवायांना पैसे पुरविणे, मदत पुरविणे, भरती करणे यामध्ये अटक करण्यात आलेल्या प्रत्येकाचा सहभाग दिसून येत असून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. ते आयएपीएल सारख्या संघटना पुढे करून कार्य करतात. समाजात मानवधिकार कार्यकर्ते आहेत असे भासवून ते माओवाद्यांसाठी काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे अॅड. पवार यांनी न्यायालयाला सांगितले.माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटक केलेले आणि जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केलेले अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी त्यांच्यासह अटक केलेल्या इतरांना या प्रकरणात पोलिसांकडून आणि सरकार पक्षाकडून गुन्हेगार अशी प्रतिमा करुन लोकांपुढे मांडले जात असून सुनावणी दरम्यान मीडीया ट्रायल केला जात असल्याचा आरोप अॅड. गडलिंग यांनी न्यायालयात केला.
बंदी असलेल्या माओवाद्यांकडूनच सक्रिय संघटनांना पैशांचा पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:26 AM