उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये माकडांच्या उच्छादामुळे भाजपा नेत्याला त्याची पत्नी गमवावी लागली आहे. कैरानामध्ये माकडांच्या उच्छादाकडे लक्ष दिले जात नाहीय. तेथील भाजपाचे वरिष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी सुषमा चौहान यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. (Monkey attack on Shamali's Bjp Leaders wife, died)
सुषमा चौहान या सक्रीय राजकारणात होत्या. भाजपाचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकम सिंह यांचा भाचा आणि भाजपाचे नेते अनिल चौहान यांची ती पत्नी होती. ती वॉर्ड नंबर 13 मधून जिल्हा पंचायतची सदस्यदेखील होती. मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मंदिरातून पूजा करून ती परतत होती. तेव्हा तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावर माकडांची झुंड असल्याचे पाहिले.
यामुळे त्यांनी धावत दुसऱ्या मजल्यावर जात माकडांना हाकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावर माकडांनी हल्ला केला. धक्का लागल्याने सुषमा यांचा तोल गेला आणि त्या जिन्यावरून खाली पडल्या. तातडीने त्यांना जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यांच्यावर मायापूर फार्महाऊसजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. हजाराच्या संख्येने लोक उपस्थित होते. माकडांच्या उच्छादामुळे लोक संतप्त झाले असून नगर पालिकेने माकडांना पकडण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. यासाठी मथुरेहून टीम बोलविण्यात आली आहे. ते सध्या लखनऊ भागात काम करत असून दोन-तीन दिवसांनी तेथून परततील असे नगराध्यक्ष हाजी अनवर हसन यांनी सांगितले.