मानसा - पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला(Sidhu Moose Wala) याच्या हत्येमध्ये ८ जण सहभागी असल्याचा संशय आहे. या सर्व आरोपींची ओळख पटलेली असून त्यातील एक आरोपी मनप्रीत सिंह मन्नूला पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे. ३ शूटर पंजाबमध्ये राहणारे आहेत तर २ महाराष्ट्र, २ हरियाणा तर १ राजस्थानचा असल्याचं समोर आले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानला पथक पाठवलं आहे.
पंजाब आणि दिल्ली पोलीस यांच्या तपासात समोर आलं आहे की, मूसेवाला हत्याकांडात विविध राज्यातून शार्प शूटर्सचा वापर जाणुनबुजून करण्यात आला. जेणेकरून तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यात येईल आणि शूटर्सचा शोध घेणं आव्हानात्मक बनेल. सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक केली आहे. पोलीस लॉरेन्स बिश्नोई गँगचे फरार शूटर्सचा शोध घेत आहे. त्यासाठी ४ राज्यात सर्च ओपरेशन सुरू आहे.
तरनतारन पंजाबमध्ये राहणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याच्यावर साहित्य पुरवठा आणि शूटर्सला गाडी दिल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीनंतर इतर ७ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींमध्ये जगरुप सिंह रुपा(पंजाब), प्रियव्रत उर्फ फौजी(हरियाणा), मनजीत उर्फ भोलू(हरियाणा), सौरव उर्फ महाकाल(पुणे, महाराष्ट्र), संतोष जाधव(पुणे-महाराष्ट्र), सुभाष बनौदा (राजस्थान) या सर्व शूटर्सचे धागेदोरे लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचा पुरावा मिळाला आहे. मूसेवालाच्या शरीरावर जवळपास २ डझन गोळ्या झाडण्यात आल्या.
पिस्तूलने दिला दगामुसेवाला यांच्यासोबत कारमध्ये असलेले गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांनी सांगितले की, मारेकरी सिद्धू मुसेवालाच्या पाळतीवर होते. पाठलाग करणारे चाहते असावेत, असे मुसेवाला यांना वाटले. मारेकऱ्यांनी मुसेवालांच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर मुसेवाला यांनी पिस्तूल काढून दोन फैरी झाडल्या. मात्र, त्यांच्या पिस्तुलीत दोनच काडतुसे होती. गोळीबार थांबल्याने मारेकरी थांबले़ तोपर्यंत बोलेरोमधून आलेल्या त्यांच्या साथीदारांनी मुसेवाला यांच्यावर हल्ला केला़.
काय आहे प्रकरण?रविवारी २९ मे रोजी सिद्धू मूसेवालांवर अंदाधुंद गोळीबार झाला. मारेकऱ्यांनी त्याच्या देहाची अक्षरश: चाळण केली. घटना घडली तेव्हा मूसेवालांसोबत त्यांचे दोन मित्र गाडीत होते. गोळीबारात ते सुद्धा जखमी झालेत. सिद्धू यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पण त्याचे दोन मित्र सुदैवानं बचावले आहेत. या मित्रांनी घटनेबद्दल माहिती दिली. अंदाधुंद गोळीबार होत असताना सिद्धू घाबरला नाही, उलट अखेरच्या क्षणापर्यंत तो लढला, असं त्यांनी सांगितलं.