राजुरा (वाशिम) : मेडशी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या पांगराबंदी वर्तुळातील देवठाणा बिटमध्ये मोराची शिकार केल्याप्रकरणी खैरखेडा येथील पाच जणांना वनअधिकाऱ्यांनी ४ डिसेंबरला दुपारच्या सुमारास अटक केली. पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, एका दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली.
पांगराबंदी वर्तुळातील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना परिसरात मोराची शिकार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून खैरखेडा येथील सुखनंदन पांडूरंग अंभोरे (२७), गजानन कळणु खुळे (२०), सखाराम पांडूरंग अंभोरे (२०), रामकृष्ण मोतीराम शिंदे (२९) व बबन पांडूरंग चावरे (५२) या पाचही आरोपींना घटनास्थळावरुनच ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी मोराची शिकार केल्याची कबुली दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांनी दिली. भारतीय वन अधिनियम १९७२ चे ९ नुसार पाचही आरोपीविरूुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींना आज न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने पाचही आरोपींना एक दिवसाची वनकोठडी सुनावली. घटनेचा पुढील तपास वनअधिकारी करत आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे, वनपाल व्ही.जी.राऊत, कर्मचारी आर.बी.चिंतलवाड, जी.बी.बोबडे, के.व्ही.देवकर, ए.यु.राठोड, व्ही.के.काळुशे, विनायक नागरे, विशाल तायडे यांनी पार पाडली. मेडशी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सिध्दार्थ वाघमारे रुजू झाल्यापासून त्यांनी सागवान तस्करांसह, वन्यप्राण्यांचा शिकारीवरही बारकाईने लक्ष ठेवून असल्याने अलिकडच्या काळात धडक कारवाया झाल्याचे दिसून येते.