मुंबई - दुचाकी वाहनांचे इन्शुरन्स संपल्याचे सांगत वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांची पॉलिसी काढून त्यांच्याकडून मिळालेली रक्कम स्वत:च्या बँक खात्यात वळवून फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गजानन केदारी पाटील (२८), प्रशांत भरमू सुतार (२५) आणि इनायत अब्दुल गणी बेद्रेकर (३१) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गु्न्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट - ३ च्या पोलिसांना माहिती मिळाली की, ओपीएस (वन पॉइण्ट सोल्युशन) जनरल इन्शुरन्स या कंपनीकडून लोकांना दुचाकी वाहनांचे वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी काढून ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट इन्शुरन्स पॉलिसी देऊन ती खरी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. या माहितीवरून पोलिसांनी फसवणूक झालेल्याचा तपास करून त्याने दिलेल्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर युनिट - ३ च्या पोलिसांनी ओपीएस (वन पॉइण्ट सोल्युशन) या कंपनच्या मुंबई येथील कार्यालयावर छापा टाकून यातील तिघा अधिकाऱ्यांना कॉम्प्युटर, कागदपत्रे आदी साहित्यासह अटक केली. अधिक तपासात ओपीएस (वन पॉइण्ट सोल्युशन) जनरल इन्शुरन्स या कंपनीचे अधिकारी बेळगाव, कर्नाटक येथे कार्यालय उघडून तेथून बजाज अलायन्स, श्रीराम जनरल, रिलायन्स जनरल, आयसीआयसीआय लॅम्बॅर्ड मोटार इन्शुरन्स आदी इन्शुरन्स कंपन्यांच्या ग्राहकांची माहिती गोळा करीत होते. त्यानंतर ज्या ग्राहकांच्या पॉलिसीची मुदत संपत आहे त्यांना फोन करून त्यांच्या नावाच्या बनावट पॉलिसी बनवत असत. त्यानंतर यातील आरोपी ग्राहकांची संपर्क साधून त्यांना घरपोच पॉलिसी पोहोचवत व त्यांच्याकडून घेतलेले पैसे स्वत:च्या खात्यावर वळवून घेत असत. अशा प्रकारे यातील आरोपींनी एक हजार लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.