लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज सरासरी ७० महिला बेपत्ता होत आहेत, अशी धक्कादायक आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत सादर केली.
देशमुख म्हणाले की, राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींची संख्या अत्यंत धक्कादायक आहे. जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी मार्च महिन्यात जवळपास २२०० जणी बेपत्ता झाल्या आहेत. पुणे शहरात बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांची संख्या सर्वाधिक आहे. बेपत्ता महिलांची ही आकडेवारी लक्षात घेऊन स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणीही देशमुख यानी केली.
९० टक्के महिला परतल्या : फडणवीस nगृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिला व मुली बेपत्ता होत असल्याबाबतचा प्रश्न हा देशपातळीवरच गंभीर झाला आहे.nपण राज्यातून बेपत्ता झालेल्या ९० टक्के महिला-मुली परत आणल्या आहेत. तरीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह खात्यावरील चर्चेत यावर आपण सविस्तर उत्तर देणार आहे.