मुंबई - मुंबईत साकिनाका पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांच्या चलाखीने उत्तर प्रदेशमधल्या 31 वर्षांच्या तरूणाला बेड्या ठोकल्या आहे. मुंबईतल्या 22 वर्षांच्या एका तरूणीला तो त्रास देत होता. कृष्णा बघेल असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्यानं या मुलीचे फोटो मॉर्फ केलेली नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली होती असं साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यातील विवाहाचा प्रस्ताव मुलीनं फेटाळल्यानं तो तिला नाहक त्रास देत होता. मुलीला त्रास देणाऱ्या या आरोपीला पकडण्यासाठी तिच्या वडिलांनी चलाखीने सापळा रचला आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना मदत केली आहे.
आरोपी कृष्णाने या मुलीशी सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री केली होती. आपण कलाकार असून आग्रा येथे राहतो आणि व्हिडिओ एडिटर असल्याचे त्याने बतावणी केली होती. नंतर त्याने या मुलीला लग्नाची मागणी घातली. मात्र, मुलीने ती मागणी फेटाळून लावली. त्यानंतर त्यांच्या दोघांचे संबंध बिघडले. पीडित तरुणीने नकार दिल्याने तिचा बदल घेण्यासाठी तिने एका भलत्याच मुलीच्या नग्न छायाचित्राला या मुलीचा चेहरा लावला आणि तो सोशल मीडियावर पसरवला. त्यामुळे या मुलीने पोलिस तक्रार केली. तसेच अनेकदा कृष्णाने पीडित तरुणीला धमकावले होते.
नंतर पोलिसांनी व या मुलीच्या वडिलांनी मिळून सापळा रचला. वडिलांनी कृष्णाशी संपर्क साधला आणि आपण चित्रपट निर्माते असल्याचे सांगितले. तसेच आपण मै हू ऑटोवाला हा चित्रपट बनवत असून त्यात मुख्य कलाकाराची ऑफर देत असल्याचे कृष्णाला त्यांनी सांगितले. आनंदाने भरवलेल्या कृष्णाने लागलीच फेसबुकवर आपल्याला चित्रपटाची ऑफर आल्याचे व आपण मुंबईला जात असल्याचे सांगितले. 26 जुलै रोजी बघेल मुंबईला आल्या त्याचक्षणी त्याला पोलिसांनी अटक केली. विनयभंग, धमकी देणे आणि आयटी अॅक्टअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सावंत यांनी पुढे सांगितले.