अमरावती : जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेला गहाण ठेवलेले प्लॉट परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी एका कर्जदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
जिजाऊ बँकेच्या अकोला शाखेतील थकीत कर्जदार डिगांबर भिकोजी पुरी (रा. सरस्वतीनगर, शेगाव) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने बँकेकडून ६० लक्ष रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामध्ये त्याने राहते घर व खुले प्लॉट गहाण म्हणून बँकेकडे ठेवला होता. परंतु, सदर मालमत्तेपैकी पाच प्लॉट त्याने परस्पर विकले. यामुळे त्याच्याविरुद्ध बँकेने शेगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. तक्रारीनुसार, डिगांबर पुरी याने २०१६ मध्ये शेगाव येथील शेत सर्वे नंबर ३९९ मधील प्लॉट नंबर ८५ ते ८९ अकोल्यातील जिजाऊ बँकेकडे गहाण ठेवून ६० लाखांचे कर्ज घेतले होते. १४ जुलै २०१६ आरोपीने बँकेला पूर्वसूचना न देता गहाण ठेवलेले प्लॉट परस्पर विकले. याप्रकरणी १५ एप्रिल २०२१ रोजी बँकेचे अकोला येथील सिव्हिल लाईन शाखाधिकारी प्रदीप काळे यांनी शेगाव शहर ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पीएसआय निखिल इंगोले करीत आहेत.बँकेची फसवणूक करणाऱ्या थकीत कर्जदारावर कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबविले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश नाशिरकर यांनी सांगितले. बँकेची फसवणूक ही आर्थिक गुन्हेगारी असून, अशा प्रकारे कृती करणाऱ्यास तथा कर्ज परतफेडीचे धनादेश देऊन बँकेत रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई केली जाईल, असे सहकार खाते पुणे प्रधिकृत वसुली अधिकारी मनीष बोडखे यांनी स्पष्ट केले.