नवी दिल्ली : अखेर वाहनचोरी रोखण्यासाठी मायक्रोडॉट तंत्रज्ञानाच्या वापरासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मसुदा प्रसिद्ध केला आहे. दिल्लीपासून या आधुनिक योजनेची सुरुवात होईल. दिल्लीत वाहनचोरीच्या सर्वाधिक घटना होतात. त्यामुळेच राज्य सरकारने तात्काळ या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला. वाहन नोंदणी तसेच अन्य सर्व सेवा आॅनलाईन असलेल्या राज्यांमध्येच ही योजना राबविता येऊ शकते.मायक्रोडॉट तंत्रज्ञान स्प्रेपासून विकसित करण्यात आले. वाहनांच्या बाह्य भागावर डोळ्यांना न दिसणारे बारीक टिंब असतील. त्यात गुप्त कोड असेल. वाहनाच्या नोंदणी कार्डाशी (आरसी) हा कोड जोडण्यात येईल.त्यामुळे वाहनाची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असेल.वाहन चोरी झाल्यास अॅपद्वारे मालक पोलिसांना त्याची माहिती देऊ शकतील. पोलिसांना तसा अलर्ट जाईल. लेजर मायक्रोडॉटच्या मदतीने वाहनाचे स्थान कळेल. मायक्रोडॉट स्प्रेसाठी १५०० रुपये खर्च येईल. त्यासाठी दोन सेवा पुरवठादारांना कंत्राट दिले जाईल.दिल्लीखालोखाल सर्वाधिक वाहने उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात चोरीला जातात. पांढऱ्या रंगाच्या वाहनांची सर्वाधिक चोरी होते.कारण रंग बदलणे सोपे असते.
सर्वाधिक वाहनचोरी दिल्लीत, मायक्रोडॉट तंत्रज्ञानाची दिल्लीत होणार अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 5:22 AM