दुबई - 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अन्य एका आरोपीसह दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या मोस्ट वाँटेंड आरोपीची ओळख अबू बकर अशी पटली असून, त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतले होते. तसेच आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईस्थित घरात शिजलेल्या बॉम्बस्फोेटाच्या कटामध्ये तो सहभागी होता. दरम्यान, अबू बकरला झालेली अटक हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अबू बकर हा मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाची आखणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बऱ्याच काळापासून मोस्ट वॉटेंड गुन्हेगारांच्या यादीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अबू बकरचे संपूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख आहे. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती. अबू बकर याच्या विरोधात 1997 साली रेड कॉर्नर नोटीस जारी झाले होते. तेव्हापासूनच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. अखेर आता त्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. अबू बकर याचे दुबईत अनेक उद्योगधंदे असून, त्याने एका इराणी महिलेशी विवाह केला आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाती अन्य एक आरोपी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली असून, मुस्तफा डोसा याचा 2017 साली मृत्यू झाला होता.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 9:14 AM
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्दे 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेतया मोस्ट वाँटेंड आरोपीचे नाव अबू बकर असे आहे. आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईस्थित घरात शिजलेल्या बॉम्बस्फोेटाच्या कटामध्ये अबू बकर सहभागी होता