नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या नवीन आडगाव नाक्यालगत समांतर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मायलेक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
दिंडोरी रोडवरील कलानगर येथील रहिवासी धम्मपाल खिल्लारे हा सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमाराला आई अंजनाबाई व भाऊ दादाराव यांच्यासह दुचाकीवरून (एमएच 15 एफडी 0364) नवीन आडगाव नाकामार्गे समांतर रस्त्याने जात असताना समोरून भरधाव आलेल्या ऍक्टिवा दुचाकीने धडक दिली. त्यात दुचाकीचे चाक तुटल्याने दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली आणि अंजनाबाई व दादाराव, चालक धम्मपाल असे तिघे दुचाकीवरून खाली कोसळले. अंजनाबाई आणि दादाराव गंभीरपणे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. अंजनाबाई नाथा खिल्लारे (60) व तदादाराव नाथा खिल्लारे (40) असे मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत. धम्मपालदेखील जखमी झाला आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात धम्मपाल खिल्लारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ती भेट ठरली अखेरची अपघातात ठार झालेले अंजनाबाई व दादाराव हे मायलेक मूळ परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील भोगावचे रहिवासी आहेत. त्यांचा दुसरा मुलगा धम्मपाल दिंडोरीरोडवर असलेल्या कलानगर म्हाडा बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून नोकरी करतो. काही दिवसांपूर्वी आई अंजनाबाई व भाऊ दादाराव असे दोघेही धम्मपालला भेटण्यासाठी परभणी येथून त्याच्या घरी आले होते. सोमवारी पुन्हा आपल्या मूळ गावी परत जायचे असल्याने मुलगा धम्मपाल दुचाकीवरून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर त्यांना सोडविण्यासाठी जात असताना काळाने झडप घातली आणि झालेल्या अपघातात धम्मपालला आपली आई आणि भावाला कायमचे गमवावे लागले.