वडगाव निंबाळकर : रोडरोमिओपासून मुलीला वाचवण्यासाठी बुधवारी एका आईने भररस्त्यात त्याला झोडपून काढले. वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे बसस्थानक परिसरात बुधवारी (दि. ११) सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगा मुलीची छेड काढत होता. मुलीला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलगा करीत होता. याबाबत पालकांनी चौकशी केल्यानंतर मुलीने त्रास देणाऱ्या मुलाचे नाव सांगितले. संबंधित मुलाला मुलीची आई असे करु नकोस असे वारंवार सांगत होती. मात्र ,तो काही केल्या ऐकत नव्हता. त्याच्याबाबत तक्रारीही आल्या होत्या, येत होत्या. सर्व काही सांगूनही मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर अखेर मुलीच्याच आईने 'दुर्गे'चे रुप धारण करीत संबंधित मुलाला रस्त्यात बदडून काढत पोलिस ठाण्यामध्ये आणले. ही माहिती मुलाच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिस ठाणे गाठुन माफी मागत प्रकरण मिटवले. चोप दिलेल्या मुला बाबत अनेक वेळा तोंडी तक्रारी झाल्या होत्या. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत या मुलाचा वावर सतत बसस्थानक, शाळा परिसरामध्ये असतो. अशावेळी रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. ..............
तीन महिन्यापुर्वीही खाल्ला मार गेल्या तीन महिन्यापुर्वीही वाटेत अडवून एका मुलीची छेड काढल्याने या मुलाला संबंधित पालकांनी चोप दिला होता. दोन वेळा मार खाऊनही मुलगा सुधारत नसल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यामधून इतरांनाही जरब बसेल, असे प्रकार पुन्हा घडु नयेत.याबाबत ठोस पावले उचलण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. ................याबाबत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित प्रकाराबाबत कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. - सोमनाथ लांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे.———————————