नवी मुंबई - सीबीडी बेलापूर येथील सेक्टर - २ मध्ये काल धुळवडीदिवशी एक धक्कादायक घटना घडली. बेलापूर सेक्टर - २ मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने राहत्या घरात सिलिंगला ओढणीने गळफास लावून केली आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. अतिशय वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा घटना घडली त्यावेळी महिलेची दोन्ही चिमुकली मुलं घरात होती. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विवाहित महिलेचं नाव आशा कुमावत (२९) आहे.
काल रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास मृत आशा यांचा पती रामस्वरूप कुमावत (३०) हे दुध आणण्यासाठी दुकानात गेले असता आशा यांनी ओढणीने राहत्या घरच्या सिलिंगला गळफास लावून आत्महत्या केली. देवघरात ही घटना घडली त्यावेळी कुमावत दाम्पत्याची ३ वर्षाची मुलगी आणि ५ वर्षाचा मुलगा मोबाईलवर खेळत होते. नंतर दूध घेऊन घरी परतल्यानंतर त्याने घरात पत्नीला लटकलेले पहिले आणि ओढणी कात्रीने कापून शेजाऱ्यांच्या मदतीने तिला बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखलपुर्व तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्याला कळविले होते. आशा यांना रिक्षेतून रुग्णालयात घेऊन जात असताना पोलीस दाखल झाले. त्यामुळे पोलीस देखील रुग्णालयात मृत महिलेच्या सोबत गेले अशी माहिती तपास अधिकारी शिंदे यांनी दिली. सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे याप्रकरणी तपास करत असून महिलेचा मृतदेह वाशी येथील मनपा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.