अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद शहरात बुधवारी भूलाभाई पार्क येथील हॉस्पिटलमध्ये आई आणि मुलगी या दोघींचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे. मुलीचा मृतदेह ऑपरेशन थिएटरच्या कपाटात तर आईचा मृतदेह बेडखाली आढळला आहे. मृत आईचं नाव चंपा आणि मुलीचं नाव भारती असल्याचं समोर आलंय. या दोघी उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल झाल्या होत्या अशी माहिती दिली जात आहे.
कागडापीठ पोलिसांच्या माहितीनुसार, या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंध येत होता. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने शोधाशोध सुरू केली. तेव्हा ऑपरेशन थिएटरच्या कपाटात कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. या कपाटात ३० वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमधून काही पुरावा सापडतोय का हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तपास करत असणाऱ्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये एका बेडखाली आईचा मृतदेह सापडला.
या प्रकरणी पोलिसांनी हॉस्पिटलच्या एका कंपाऊंडरला ताब्यात घेतले आहे. पोलीस सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. या माय लेकीला सुरुवातीला इंजेक्शन लावले गेले त्यानंतर गळा दाबून दोघींची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. भारती विवाहित होती परंतु ती आईसोबत नारोल इथे राहायला होती. फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीनंतर या दोघींना भुलीचं इंजेक्शन दिल्याचं समोर आले. हत्येच्या मागे षडयंत्र असण्याची शक्यता आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव मनसुख मैत्रा असं आहे. तो गेल्या १० वर्षापासून हॉस्पिटलमध्ये काम करतो. मनसुख ENT डॉक्टरांकडून रुग्णांवर केले जाणारे उपचार पाहत असे. त्यानंतर तो डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णांवर स्वत: उपचार करायचा. मनसुखला पैशांची गरज असल्याने तो अनेक रुग्णांवर उपचार करायचा. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांसोबत त्याने ओळख केली. या रुग्णांवर त्याने शस्त्रक्रिया केल्या आणि झटपट पैसे मिळवले.
भारतीचा पती हा मनसुखचा मित्र होता. भारती आई चंपासह कानाच्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलला आली होती. तेव्हा मनसुखने भारतीला दिलेल्या एँनेस्थेसियाचा ओव्हरडोसमुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे मनसुख घाबरला. याच स्थितीत त्याने भारतीची आई चंपाचीही हत्या केली. मृतदेह लपवण्यापूर्वी मनसुखने या दोघींच्या अंगावरील दागिने काढून घेतले. रुग्णांवर उपचार करताना मनसुख हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही बंद करायचा. सध्या या प्रकरणाचा पोलीस आणखी तपास करत आहेत. गुरुवारी मनसुखला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.