अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षक सन्मती कॉलनीतील एका बंद घरात मायलेकीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गाडगेनगर पोलिसांनी घराचा बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
सुवर्णा प्रदीप वानखडे (51) व मृणाल प्रदीप वानखडे (25)अशी मृत मायलेकीची नावे आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुवर्णाचे पती तथा मृणालचे वडील हे दर्शनासाठी शेगावला गेल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. ते यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही मायलेकी घराच्या बाहेर पडल्या नाहीत, त्यामुळे काही शेजाऱ्यांनी वानखेडे यांच्या घराचे दार ठोठवले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी गाडगेनगर ठाण्याला माहिती दिली.
रात्री 9 च्या सुमारास ठाणेदार आसाराम चोरमले हे यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दार तोडले असता आतील दृश्य भयावह होते. सुवर्णा व मृणाल या मायलेकी गळफास घेतलेल्या स्थितीत मृतावस्थेत होत्या. पोलिसांनी घटनास्थळाहून सुसाईड नोट जप्त केली आहे. घरगुती करणातून दोघीनी जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रदीप वानखडे हे अमरावतीला पोहोचलेले नव्हते. त्यामुळे घटनेच्या मागील कारण सुस्पष्ट होऊ शकले नाही. तूर्तास गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही मृतदेह इर्वीन रुग्णालयच्या शवागारात ठेवली आहेत. प्रदीप यांचे पत्नी व मुलीशी सख्य नसल्याची बाब प्राथमिक तपासावरून उघड झाली आहे.