पाच मुलांची आई, पण सांभाळायला कुणी तयार नाही, तक्रार करताच तीन मुलगे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:06 PM2021-05-31T16:06:14+5:302021-05-31T16:07:00+5:30
Crime News: पाच मुलगे असूनही एका वृद्ध आईवर दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. लहानाचे मोठे केलेल्या पाचही मुलांनी वृद्धापकाळात आधार देण्यास नकार दिल्याने अखेर या वृद्ध आईला अखेरीस पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.
भोपाळ - मुले ही वृद्धापकाळातील आधार मानले जातात. मात्र आता बदलत्या काळाबरोबर वृद्ध आई-वडील हे मुलांना ओझे वाटू लागले आहेत. वृद्ध आई-वडलांचा सांभाळ करण्यास अनेक मुले तयार होत नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये समोर आला आहे. पाच मुलगे असूनही एका वृद्ध आईवर दारोदारी भटकण्याची वेळ आली आहे. लहानाचे मोठे केलेल्या पाचही मुलांनी वृद्धापकाळात आधार देण्यास नकार दिल्याने अखेर या वृद्ध आईला अखेरीस पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. (Mother of five children, but no one is ready to take care of her)
मध्य प्रदेशमधील राजागड येथील देवाखेडी गावातील रहिवासी असलेल्या रामकुंवर बाई ह्या पतीच्या निधनानंतर एकट्याच राहत आहेत. त्यांचे पाच मुलगे आहेत. मात्र त्यांचे विवाह झाल्यानंतर हे पाचही मुलगे त्यांच्या त्यांच्या पत्नींसह वेगळे राहू लागले. मात्र एकट्या राहिलेल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्यासाठी कुणीही पुढे येईना.
अखेर मदतीसाठी लाचार झालेल्या या वृद्ध मातेने मदतीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर एसपी प्रदीप शर्मा यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांच्या माध्यमातून पाचही मुलांना समज दिली. मात्र तरीही वृद्ध आईला आधार देण्यास पाच मुलांमधील कुणीही तयार होईनात. अखेरीस पोलिसांनी पाचही मुलांविरोधात ज्येष्ठ नागरिक देखभाल अधिनियम २४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाचपैकी राजेंद्र सिंह, हिंमत सिंह, आणि रमेश सिंह या तीन मुलांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अन्य दोन मुलांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.