लाखांदूर (भंडारा): घरात कोणीही नसताना घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अंतरा-अंतराने चोरी प्रकरणी खुद्द आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलाची पोलिसात तक्रार केल्याची घटना घडली.सदर घटना लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे गत १३ ऑक्टोबर रोजी घडली असुन तक्रारिवरुन लाखांदूर पोलीसांनी अल्पवयीन मुलाविरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिस सुत्रानुसार, फिर्यादी महिला ही तिच्या अल्पवयीन मुलासह दोनाड येथे कायम रहिवाशी आहे. घरात अल्पवयीन मुलासह दोघेच राहत असताना सबंधित फिर्यादी आईने तिचे मालकीचे सोन्याचे दागिने घरातील लोखंडी कपाटात सुरक्षित ठेवले होते. या दागिन्यांमध्ये सोन्याची अंगठी,नथ व कानातील बि-या असे वजनी २० ग्रँम किमत ७० हजार रु.च्या दागिण्यांचा समावेश आहे.
सदर दागिन्यांची माहिती अल्पवयीन मुलाला होताच सबधिताने मागिल काही महिन्यांपासून अंतरा-अंतराने घरातील दागिन्यांची चोरी करुन गावातीलच काही सुवर्णकार व्यवसायिकाना विकले. दरम्यान घटनेच्या दिवशी फिर्यादी आईने दागिने ठेवलेले लोखंडी कपाट उघडून दागिन्यांची चौकशी केली असता कपाटात दागिने आढळून न आल्याने तीने पोटच्या मुलाची विचारपुस केली.मात्र सदर विचारनेत अल्पवयीन मुलाकडून दागिन्यासबन्धाने आवश्यक माहिती दिली जात नसल्याचे पाहुन तिने नाईलाजाने लाखांदूर पोलिसात पोटच्या अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारिवरुन लाखांदूर पोलीसांनी भादंवि चे कलम 380अन्वये गुन्हा नोंदवीत घटनेचा तपास चालविला असुन या तपासा अंतर्गत चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने मिळाले असल्याची माहिती पोलीसांनी दिली असुन या घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पोलिस शिपाई मनिष चव्हाण करीत आहेत.