भीलवाडा - राजस्थानच्या भीलवाडा इथं १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने हॉस्पिटल परिसरात स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर मुलाला तातडीने उदयपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री १०.४० च्या सुमारास महात्मा गांधी हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. गोळीचा आवाज ऐकून हॉस्पिटलमध्ये खळबळ माजली. त्याठिकाणी तातडीने पोलीस पोहचले. घटनास्थळी पोलिसांनी युवकाचा मोबाईल, चष्मा आणि पिस्तुल जप्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार, १७ वर्षीय युवक हा कारोई परिसरात राहणारा आहे. ११ वीच्या वर्गात तो शिक्षण घेत होता. घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्ही मुलाने गोळी झाडतानाचा प्रकार कैद झाला आहे.
युवकानं गोळी मारण्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर एक स्टेटस ठेवले होते. त्यात म्हटलं होतं की, आई, पुढील जन्मी मी तुझाच मुलगा बनेन. परंतु कुणावरही प्रेम करणार नाही. त्यामुळे प्रेम प्रसंगातून मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आत्महत्येच्या ८ तासापूर्वी त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुला कुणासोबत पाहू शकत नाही असं लिहिलं होते.
मी मृत्यूला कवटाळणार असल्याचं मुलाने नातेवाईक आणि मित्रांना सांगितले होते. सोशल मीडियावर मुलाने पोस्टला टॅगही केले होते. नातेवाईक त्याला शोधण्यासाठी फिरत होते मात्र युवकाचा थांगपत्ता लागला नाही. कुणाचेही फोन त्याने घेतले नाहीत. मृत्युपूर्वी त्याने सर्व मित्रांवर माझं प्रेम असून पुढच्या जन्मी तुम्ही मित्र बनावं असं लिहिलं. एका स्टेटसमध्ये त्याने प्रेयसीच्या नावाचाही उल्लेख केला. तुला विसरून जगू शकणार नाही. तुझ्याशिवाय कुणासोबत राहू शकणार नाही. त्यासाठीच मी हे पाऊल उचलतोय. माझं प्रेम तुझ्यावर आहे असं त्याने स्टेटसमध्ये लिहिलं. हॉस्पिटलच्या परिसरात युवकाने स्वत:वर गोळी झाडली. त्यानंतर जमलेल्या लोकांपैकी काहींनी त्याला रुग्णालयात भरती केले. घटनास्थळी पिस्तुल आणि एक मोबाईल जप्त केला. पोलीस या मुलाकडे पिस्तुल कशी आली, कुणी दिली याचाही तपास करत आहेत.