मुंबई : साडेतीन वर्षांच्या मुलाला छातीशी कवटाळत एका आईने उंच टॉवरवरून उडी मारत मृत्यूला कवटाळले. ही घटना चुनाभट्टी परिसरात शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. श्रुती महाडिक (वय ३६) आणि राजवीर (३.५) त्यांची नावे आहेत. या मायलेकाचे मृतदेह नाल्यात सापडले आहेत. चुलत दिरासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून तिने हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले असून, चुनाभट्टी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
श्रुती या कुर्ला येथील कामगार नगरमध्ये मुलगा राजवीर, पती यशराज, सासरे नंदादीप आणि चुलत दीर सचिन महाडिक आणि त्याच्या कुटुंबासह ड्युप्लेक्समध्ये राहत होती. जवळपास चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून, यशराजचे किराणा मालाचे दुकान आहे. श्रुती ही गृहिणी होती. नेहरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी, २०२२ रोजी श्रुती घरातून राजवीरला घेऊन निघून गेली. तिने जाताना एक सुसाईड नोट लिहिली. ज्यात चुलत दिराच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे तिने लिहिले. निघताना तिने तिची आई विद्या म्हात्रे यांना फोन करत मुलासह आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
मृत मुलीची आई पती विलास म्हात्रे यांच्यासोबत ठाण्याला राहतात. तेव्हा तिच्या आईने यशराजला याबाबत कळविले आणि त्यांनी श्रुतीला फोन केला. मात्र तो फोन तिने घरीच ठेवल्याने तिचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर त्यांनी रात्री नेहरूनगर पोलिसांना सुसाईड नोट दाखवत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्याची नोंद करत तिला शोधण्यास सुरुवात केली. अखेर दोघांचे मृतदेह चुनाभट्टी येथील नाल्यात सापडले. त्यानुसार पोलिसांनी तिचा दीर सचिन महाडिक याला ताब्यात घेतले असून, सर्वांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत. चुलत दिरासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून तिने हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. मायलेकाचे मृतदेह शवविच्छेदन करून कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
उडालेल्या पाण्याने दाखवले लोकेशन
सतत दोन दिवस श्रुती महाडीक आणि तिच्या मुलाचा शोध नेहरूनगर पोलिसांनी घेतल्यानंतरही ते कुठेच सापडले नाहीत. अखेर पुन्हा सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. आणि एका कॅमेऱ्यात नाल्याचे पाणी काही सेकंदासाठी वर उडताना त्यांना दिसले आणि त्याच लोकेशनची मदत घेत त्यांनी गाळ उपसत दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
नेहरूनगर पोलिसांनी तक्रार मिळताच आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली. त्यावेळी कुर्ला येथील कामगार नगरमध्ये स्टेशन रोडवर त्यांना श्रुती शेवटची रिक्षातून जाताना दिसली. तेव्हा पोलिसांनी लाल डोंगर परिसरात तिच्या पालकांचे बंद घर असलेल्या अल्टाविस्टा या इमारतीजवळील सीसीटीव्ही तपासले. ज्यात ती गेटमधून आत येताना दिसली, मात्र बाहेर जाताना दिसत नव्हती. त्यामुळे कंपाउंडमध्ये नेहरूनगर पोलिसांनी तिचा शोध घेऊनही ती दिसली नाही. या कंपाउंडला लागून एक नाला आहे आणि त्याच्या पलीकडे २० ते २५ फुटांचा एक डोंगर आहे. याच फटीत दोन ते तीन फूट आत ते दोघे पडले होते. आम्ही इमारतीच्या मागचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यामध्ये आम्हाला नाल्यातील पाणी अगदी काही सेकंदासाठी वर उडताना दिसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भाबल यांनी सांगितले.