काळाचौकी बाळ चोरी प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीचे शोधकार्य थांबवले आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील घोडपदेव येथील संघर्ष सदन इमारतीत दिवसाढवळया आईला गुंगीचे औषध देऊन ३ महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली होती. त्यांनतर पोलिसांची विविध पथके रात्रंदिवस मुलीचा शोध घेत असताना मुलीचे अपहरण झाले नसून मुलगी झाली म्हणून तिला पाण्याच्या टाकीत टाकून तिची हत्या आईनेच केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आईने भांडी विक्रेत्या महिलेने गुंगीचे औषध देऊन ३ महिन्याच्या मुलीचे अपहरण केल्याचा बनाव रचला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी आईला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्यची माहिती पोलिसांनी दिली. सपना मगदूम असं आरोपी महिलेचं नाव आहे.
काय बनाव रचला होता?
जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असं सांगून महिलेला बेशुद्ध केलं आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचं अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा काळाचौकी पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. मात्र तसे नसून अवघ्या तीन महिन्याच्या चिमुकलीची आईनेच हत्या केली आणि तिला घरातल्या पाण्याच्या टाकीत टाकलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सत्य उघड झालं आहे. ३० नोव्हेंबरला महिला घरी एकटी होती. त्यावेळी दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास एक ३० ते ३५ वर्षाची महिला आली. जुन्या मोबाइलच्या बदल्यात भांडी देण्याचं सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला. सपना मगदूम यांची तीन महिने पंधरा दिवसांची मुलगी वेदा ही पलंगावर झोपली होती. भांडीवाल्या महिलेला देण्यासाठी घरात असलेला जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मगदूम आतल्या खोलीत जात होत्या. तेवढ्यात आरोपी महिला पाठी मागून आली आणि तिनं बेशुद्ध करण्याचं औषध सपना यांच्या नाकाला लावून त्यांना बेशुद्ध केलं. पलंगावर झोपलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्यासोबत घेऊन पसार झाली, असा बनाव सपना मगदूम या आरोपीने रचला होता. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. कालच आरोपी महिलेचं रेखाचित्र देखील प्रसारित केलं. मात्र, तपासाअंती पोलिसांना आईनेच मुलगी नको असल्याने तिची हत्या केल्याचं सत्य उघडकीस आलं.