छतरपूर – मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी एका महिलेने तिच्या दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत फेकलं. ज्यात एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेनंतर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परंतु या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छोटी मुलगी १० महिन्याची तर मोठ्या मुलीचं वय ४ वर्ष होतं. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवलं आहे. मोठ्या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या पोलीस मृत महिलेच्या कुटुंबाची आणि गावातील आसपास राहणाऱ्या लोकांची चौकशी करत आहेत. गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा महिलेने तिच्या मोठ्या मुलीला विहिरीत ढकललं तेव्हा तिच्या कपड्याचा काही भाग दगडात अडकला आणि ती बचावली.
मृत महिला आणि तिच्या सासूमध्ये मोबाईलवरुन भांडण झालं. सासूनं सुनेच्या हातातून मोबाईल खेचून घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या सुनेने हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना सटई ठाण्याच्या पारवा गावातील आहे. मृत महिलेच्या सासूने पोलिसांना सांगितले की, जेव्हा मी माझ्या सुनेच्या हातून मोबाईल खेचून घेतला तेव्हा ती जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर ती दोन्ही मुलींना घेऊन जनावारांना चारा देण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली. काही वेळेनंतर आम्हाला कळालं की, तिने दोन्ही मुलींना विहिरीत ढकललं आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
पोलिसांचा तपास सुरु
तर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी मृत महिलेच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना फोन करून कळवलं. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी लहान मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि गळफास घेतलेल्या महिलेचा मृतदेह खाली उतरवला. एक मुलगी गंभीर जखमी झाली होती तिला हॉस्पिटलला उपचारासाठी पाठवलं. या प्रकरणात डीएसपी शशांक जैन यांनी पारवा गावातून एका महिलेने दोन मुलींना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा फोन आला. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं सांगितले आहे.