धीरेंद्र चाकोलकर
अमरावती - आई-वडील मुलांसाठी खस्ता खातात. मात्र, खरकाडीपुऱ्यातील तिघा भावंडाना आईने बालपणी सोडले, तर मद्यपी बाप बदल्याच्या भावनेतून त्यांचा छळ करीत होता. त्यांना या नरकयातनेतून चाइल्ड लाइनने सोडवून शासकीय बालगृहात दाखल केले. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा, भयमुक्त जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगेश रंधवे असे मद्यपी बापाचे नाव आहे. त्याला १० वर्षांचा मुलगा, तर सात आणि पाच वर्षांच्या दोन मुली आहेत. या तीन मुलांसह नवऱ्याला त्याची पत्नी अनेक वर्षांपासून सोडून गेली आहे. मंगेश त्यांचा योग्य सांभाळ करण्याऐवजी मद्यधुंद अवस्थेत त्यांना मारहाण करीत होता. याशिवाय त्यांना शाळेत जाण्यास मनाई करून शिक्षणापासून वंचित ठेवले होता. या मुलांचे पालनपोषण योग्य होत नसल्याचे संपर्क व्यक्तीने १०९८ या क्रमांकावर कळविले होते. त्यामुळे चाइल्ड लाइनने या मुलांना दारूड्या बापाच्या तावडीतून सोडविण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ केला. सहायक पोलीस निरीक्षक सोनू झामरे यांच्या नेतृत्वातील खोलापुरी गेट पोलिसांच्या मदतीने चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी मुलांना गाठले आणि त्यांचे सांत्वन व समुपदेशन केले. या प्रकरणाची माहिती बाल कल्याण समितीलाही देण्यात आली. पोलिसांच्या साहाय्याने या मुलांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांची अमरावती येथील शासकीय बालगृहात व्यवस्था करण्यात आली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव माधुरी चेंडके, चाइल्ड लाइन संचालक सूर्यकांत पाटील, प्रशांत घुलक्षे तसेच समुपदेशक अमित कपूर, चमू सदस्य शंकर वाघमारे, मीरा राजगुरे, पंकज शिनगारे, सरिता राऊत, सुरेंद्र मेश्राम व चेतन वटके यांनी प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुरावा घेतला.
सदर तीन मुलांच्या पुढील शिक्षणासाठी व्यवस्था केली जाईल. मुलांना कुठलीही समस्या, मदत लागल्यास चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर विनामूल्य संपर्क करावा. संपर्क व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल. - फाल्गुन पालकर, समन्वयक, चाइल्ड लाइन