उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका शास्त्रज्ञाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आता खळबळजनक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या शास्त्रज्ञाच्या अल्पवयीन मुलाने केली आहे. हत्येमागील कारण जाणून सगळेच चक्रावून गेले. आईने मुलाला शाळेत जाण्यासाठी सांगितलं तेव्हा त्याने रागाच्या भरात आईला धक्काबुक्की केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. मात्र मुलाने आईला दवाखान्यात नेलं नाही तर कुणालाही न सांगता शांतपणे शाळेत गेला. याच दरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने आईचा मृत्यू झाला.
मुलगा शाळेतून परतल्यावर आईचा मृतदेह पाहून अस्वस्थ झाला. पण तरीही त्याने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. ६ दिवस तो आईच्या मृतदेहासोबत घरातच राहिला. दुसरीकडे, शास्त्रज्ञ ६ दिवसांनंतर आपल्या घरी पोहोचला. मृतदेह असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत होता. मी दरवाजा उघडला तेव्हा पत्नीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला.
चौकशी केली असता मुलाने वडिलांसह पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मुलाने आपला गुन्हा कबूल केला. त्याने आपल्या आईला कसं ढकललं आणि त्यानंतर तिचं डोकं भिंतीवर आदळलं हे सांगितलं. मुलगा हा बारावीत शिकत आहे.
सुरुवातीला पडल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचं मुलाने पोलिसांना आणि वडिलांना सांगितलं. मात्र शवविच्छेदन रिपोर्ट पोलिसांना मिळताच मृत्यू ६ दिवसांपूर्वी झाल्याचं निष्पन्न झालं. शरीरावर जखमा आणि काही खुणा होत्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता मुलाने संपूर्ण हकीकत सांगितली.
असं सांगितलं जात आहे की, आई अनेकदा आपल्या मुलाला अभ्यासावरून ओरडली होती. तिने मुलाची शाळेतही तक्रार केली होती, त्यामुळे मुलगा संतापला. याच दरम्यान आईने सकाळी मुलाला उठवलं आणि पुन्हा शाळेत पाठवलं. त्याचवेळी मुलाने आईला धक्का-बुक्की केली. यातच आईचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.