मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, एजाज लकडावाला, रवी पुजारी या सर्वांना त्यांच्या गोरखधंद्यामध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांची मुंबई गुन्हे शाखेने धरपकड सुरू केली आहे. त्यातच आता प्रसाद पुजारी याच्या आईविरोधात देखील मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विक्रोळी येथील व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी प्रसाद पुजारी आणि त्याच्या साथीदारांवर विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कुख्यात गुंड प्रसाद पुजारीची आई इंदिरा विठ्ठल पुजारी (६२) हिच्यासह अन्य एकाला पोलिसांनीअटक केली आहे.विक्रोळीतील शिवसेना उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गँगस्टर प्रसाद पुजारीच्या सांगण्यावरून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होते. त्यानुसार, या प्रकरणी एकाला मध्य प्रदेश तर दुसऱ्याला ठाणे येथून विक्रोळी पोलिसांनी अटक केली. कृष्णधर सिंग आणि आनंद फडतरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.विक्रोळीतील रहिवासी असलेले जाधव यांच्यावर १९ डिसेंबर रोजी मंदिराच्या आवारातच गोळीबार करण्यात आला होता. जाधव विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. विक्रोळीतील म्हाडा किंवा अन्य शासकीय, खासगी इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, त्यातील विविध कंत्राटे, लोकप्रतिनिधींच्या निधीतून केल्या जाणाºया विविध योजना आदींची जबाबदारी जाधव पाहात होते. येथील संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या प्रसाद पुजारी याने जाधव यांना अनेकदा धमकावले होते, अशी माहिती यापूर्वी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार, पोलीस या प्रकरणाची शहानिशा करत होते.
शिवसेना उपविभागप्रमुख गोळीबार प्रकरणात दोघांना अटकहत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय सावंत यांनी तपास सुरू केला. पथकाने ताब्यात घेतलेला आरोपी सागर मिश्रा हा जखमी असल्याने बोलण्याच्या स्थितीत नव्हता. त्यातही तो खोटी माहिती देत असल्याने तपासात अडथळा निर्माण होत होता. पुढे आरोपीकडून हस्तगत केलेल्या रिव्हॉल्वरवरून पथकाने शोध सुरू केला. त्याच्याकडील रिव्हॉल्वर कानपूर आॅर्डनन्स फॅक्टरीतील असल्याचे समजताच पथकाने तोच धागा पकडून चौकशी सुरू केली. त्यातूनच मध्य प्रदेश, कर्नाटक कनेक्शन समोर येताच तपास पथक तेथे गेले. मध्य प्रदेशातून कृष्णधर सिंग, तर ठाणे येथून आनंद फडतरेला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी परदेशात तळ ठोकून असलेल्या गँगस्टर प्रसाद पुजारीने सिंग व सागर मिश्राला गोळीबार करण्यासाठी मुंबईत पाठविल्याचे समोर आले होते. मुंबईत पोहोचल्यावर त्याच्या एका साथीदाराने दोघांची राहण्याची व्यवस्था केली होती. पुढे फडतरेने त्यांना वाहन क्रमांक नसलेली दुचाकी दिली होती. त्यानुसार, ती दुचाकी घेऊन आरोपींनी जाधव यांच्यावर गोळीबार केला. त्यानुसार, दोघांनाही यात अटक करण्यात आली होती. तपासात त्याला पुजारीने २५ हजार खात्यावर पाठवल्यानंतर तो व्यावसायिकाच्या कार्यालयात पुजारीचा संदेश घेऊन आला असल्याचे स्पष्ठ झाले. हे पैसे भरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने अटक केली. त्याच्या चौकशीत प्रसादची आई इंदीरा पुजारीच्या सांगण्यावरून तो ते पैसे भरण्यासाठी गेला असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी इंदीरासह अन्य एकाला अटक केली. या प्रकरणी गुन्हे शाखा ७ चे पोलीस अधिक तपास करत आहेत.