नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. पण याच सुरक्षा रक्षकांना मारहाण झाल्याची गंभीर घटना बुधवारी रात्री घडली आहे. या मारहाणीची घटना तिसऱ्या डोळ्यात म्हणजे सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या संपुर्ण घटनेने महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना दोन दिवसांपूर्वी लेखी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार महानगरपालिकेच्या "ब" प्रभाग समितीमधील नालासोपारा पूर्वेकडील सर्वोदय वसाहतीमध्ये माता बाल संगोपन केंद्र आहे. या हॉस्पिटलचा वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री गोरख यांनी कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालते. 22 मे (बुधवार) ला रात्री नालासोपारा पूर्वेकडील पाचअंबा मध्ये राहणारी 33 वर्षीय महिलेचा बाळंतपण सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी साडे दहाच्या सुमारास नातेवाईक भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. रात्रीची वेळ असल्याने सुरक्षा रक्षक जयप्रकाश मिश्रा आणि विनय दुबे या दोघांनी महिला वार्ड असल्याने पुरुष नातेवाईकांना बाहेर जाण्यासाठी सांगितले. पण त्यांनी बाहेर जाण्याऐवजी सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालण्याची सुरुवात केली व शेवटी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांनी ऑपरेशन कक्षामध्ये नेऊन जबर मारहाण केली होती. महिलेच्या नातेवाईकांनी केलेली मारहाणीची घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही मध्ये चित्रण कैद झाले आहे. मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून मारहाणीची चौकशी करत आहे.
मारहाणीच्या घटनेची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. ज्यांचा सुरक्षा रक्षकांचा ठेका आहे त्या कंत्राटदाराला सुद्धा माहिती दिलेली आहे. - डॉ. गायत्री गोरख (वैद्यकीय अधिकारी, वसई विरार महानगरपालिका हॉस्पिटल)