उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका महिलेने आपल्या निष्पाप मुलीला टेरेसवरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिला तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलायची. मुलगी या संभाषणात व्यत्यय आणून तिला त्रास द्यायची. कधी कधी ती वडिलांना आईबद्दल सांगायची. याला कंटाळून एके दिवशी महिलेने मुलीला टेरेसवरून फेकून दिलं.
कुटुंबीय सुरुवातीला हा अपघात समजत होते. मात्र शेजारी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून महिलेची ओळख उघड झाली. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. अनाम नावाच्या महिलेने तिच्या अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केली कारण महिला तिच्या बॉयफ्रेंडशी बोलत असताना मुलगी त्रास देत होती. मुलीच्या हत्येनंतर अनमने हा अपघात झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. मुलीची आठवण काढून ती खूप रडली.
आठवडाभरापूर्वी घडलेल्या या घटनेला लोक अपघात मानत होते. परंतु शेजारी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अनमने आपल्या मुलीला टेरेसवरून फेकल्याचं फुटेज समोर आल्याने हे रहस्य उघड झालं. त्यानंतर पती मुर्शिदच्या वतीने पत्नी अनमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
बरेलीच्या सीबी गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसाखेडा औद्योगिक परिसरात एका कारखान्यात वेल्डरचे काम करणाऱ्या मुर्शिदला तीन मुलं आहेत. पत्नी अनमने मुलीला टेरेसवरून खाली फेकलं आणि मुलगी जखमी झाल्याची माहिती पतीला दिली. माहिती मिळताच मुर्शिदने घरी धाव घेतली आणि मुलीला रुग्णालयात नेले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. पती आणि कुटुंबीय मुलीचा मृत्यू हा अपघात मानत होते.
मुलीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी अनम तिच्या माहेरी गेली. यावर पती मुर्शिदला शंका आली. याच दरम्यान, मुर्शिदने शेजारच्या घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्याला मोठा धक्का बसला. कारण, त्यात पत्नी मुलीला टेरेसवरून खाली फेकताना दिसत होती. यानंतर मुर्शिदने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फुटेज तपासलं, अनमची चौकशी केली, त्यानंतर तिला अटक केली.