लखीसराय: आईच्या मायेची, तिच्या प्रेमाची तुलना जगातील कशाशीही होऊ शकत नाही. आईसारखं दैवत संपूर्ण जगात नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं म्हणतात. मात्र जन्मदात्या आईनंच आपल्या पोटच्या गोळ्याला संपवण्याचा प्रयत्न केला तर..? बिहारच्या लखीसरायमध्ये असा प्रकार घडला आहे. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
लखीसरायच्या कवैया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंजाबी मोहल्ल्यात एक धक्काप्रकार घडला. एका महिलेनं तिच्या नवजात मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे चिमुकल्या मुलीचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नवजात बालिकेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
पंजाबी मोहल्ल्यात वास्तव्यास असलेल्या अशोक यादव यांची पत्नी लक्ष्मी देवी उर्फ ऋचा देवी यांनी त्यांच्या लहान मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं याच परिसरात राहणाऱ्या आशा देवी यांनी सांगितलं. 'लक्ष्मी देवीनी १० दिवसांपूर्वी घरातच एका मुलीला जन्म दिला. शनिवारी संध्याकाळी तिनं मुलीला अंथरुणात गुंडाळलं आणि तिला विटांनी दाबलं. त्याचवेळी मोहल्ल्यातल्या काही महिलांनी तिला पाहिलं,' असं आशा देवी यांनी सांगितलं.
स्थानिक महिलांना हा प्रकार पाहून धक्काच बसला. त्यांनी महिलेला रोखलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नवजात बालिकेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मी मुलीला मारत नव्हते असा दावा लक्ष्मी देवी यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.