ठाणे: अवघ्या पाच महिन्यांच्या श्रीकांत या आजारी मुलाला दिलेला खोकल्याच्या औषधाचा डोस जास्त झाला. त्यानंतर तो मृत पावल्याचा समज करुन पती आणि सासरे रागावतील या भीतीपोटी त्याला पाण्याच्या पिंपात टाकून त्याचा जीव घेणाऱ्या शांताबाई चव्हाण (३०, रा. सायबानगर, कळवा, ठाणे) या जन्मदात्रीलाच अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली. विशेष म्हणजे पुरावा नष्ट करुन आपल्या मुलाच्या अपहरणाची तक्रारही तिने आदल्या दिवशी दाखल केली होती.
पाण्याने भरलेल्या प्लास्टीकच्या पिंपात बुडवून मुलाची हत्येची संतापजनक घटना शनिवारी उघड झाली. उपायुक्त अंबुरे यांच्यासह सहायक आयुक्त व्यंकट आंधळे वरिष्ठ पेालीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जितेंद्र कुंवर, सुदेश आजगावकर आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश दिनकर, सागर गोंटे, उपनिरीक्षक किरण बघडाणे, जमादार एम. पी. महाजन आणि हवालदार शिंदे आदींच्या पथकाने मेहनत घेऊन खूनाचा गुन्हा २५ डिसेंबर रोजी दाखल झाल्यानंतर नातेवाईकांसह परिसरातील १५ जणांची चौकशी केली. शिवाय, शांताबाई आणि तिचा पती शंकर यांची कसून चौकशी केली. तेंव्हा प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देणा:या शांताबाईवरच तपास पथकाचा संशय बळावला. अखेर अनेक दिवस खोकला आणि उलटीने आजारी असलेल्या मुलाला खोकल्याचे औषध दिल्यानंतर हा डोस जास्त झाला. त्यात तो बेशुद्ध झाला. पण तो मृत पावल्याचे समजून घरातील मंडळी रागावतील या भीतीपोटी त्याला आधी घराजवळच लवपून तो बेपत्ता झाल्याची तक्रार तिने २४ डिसेंबर २०२१ रोजी कळवा पोलीस ठाण्यात दिली. हा तपास सुरु असतांनाच तिने शेजारचे शंकर राठोड यांच्या घराबाहेरील प्लास्टीकच्या पिंपामध्ये बाळाला टाकले. त्यावर झाकण ठेवल्यामुळे हे पिंप कोणाच्या नजरेस आले नाही. दुस:या दिवशी मात्र, राठोडच्या पत्नीने पाणी काढण्यासाठी पिंप उघडले. तेंव्हा तिला श्रीकांतचा मृतदेह पाण्यात आढळल्याने खूनाचा प्रकार समोर आला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मात्र आईनेच त्याचा खून केल्याचे उघड झाल्याचे समोर आले.
सायबानगर झोपडपट्टीमधील चव्हाण दाम्पत्याला चार वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाची एक मुलगी आहे. तिसऱ्या पाच महिन्यांच्या श्रीकांतच्या खून प्रकरणात आईला पोलिसांनीअटक केली आहे. यात आणखी काही वेगळे कारण आहे का? याचाही सखोल तपास सुरु असल्याचे उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.