नवी दिल्ली - देशात अनेक भयंकर घटना घडत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एकीकडे आईचा मृतदेह तर दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हि़डीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आईच्या मृतदेहाशेजारी तिची दोन्ही मुलं आणि सुना भांडत असल्याची घटना समोर आली आहे. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं आणि एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील मुक्तसर साहब गावात ही संतापजनक घटना आहे. या गावातील एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या मोठ्या मुलाच्या घरी आलेला लहान मुलगा आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी दोघांमध्ये मारहाण देखील झाली आहे. सोथा निवासी मंगा सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते काही दिवसांपूर्वी एका लग्नासाठी येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या छोट्या जावेने तिला मारहाण केली. याबाबत 18 जून रोजी पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. परंतू पोलिसांनी कारवाई केली नाही. तर त्या काळात तिच्या वृद्ध आईचा मृत्यू झाला.
या प्रकरणी त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. मात्र त्यांना आपल्या वृद्ध आईच्या मृतदेहाचाही विसर पडला. दोन्ही भाऊ आपल्या पत्नीसह एकमेकांशी भांडण करू लागले. आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही मुला-सूनांची भांडणं सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार बराच वेळ सुरू असल्याने शेवटी पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही मुलांची समजून काढून आधी वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आलं. आईचा मृतदेह शेजारी पडलेला असताना अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या मुलांवर सोशल मीडियातून टीका केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन
आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या देवघर जिल्ह्यात किशन चौधरी याची आई ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. आईला वाचवण्यासाठी किशनने सर्वोतोपरी प्रयत्न केले. उपचारासाठी खूप खर्च देखील केला. मात्र आईला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. आईच्या उपचारासाठी पैसे खर्च केल्याने अंत्यसंस्कारासाठी त्याच्याकडे पैसेच नव्हते.
किशनची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. आईच्या निधनाने त्याला फार मोठा धक्का बसला होता. गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र त्याच्याकडे अंत्यविधीचं सामान घेण्यासाठीही पैसे नव्हते. आईच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना किशन घरात गेला आणि आतून कडी लावून घेतली. नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी त्याला बाहेर बोलावलं असता त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही आणि आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सर्वांना संशय आला. दरवाजा धक्का देऊन उघडला असता किशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.